(वातावरण बदलामुळे हेलिकॉप्टर प्रवासाच्या नियोजनात बदल)
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी शनिवारी (दि.३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौऱ्यात पावसाच्या अंदाजामुळे अचानक बदल झाला आहे. या बदलामुळे ओझर विमानतळावर उतरल्यानंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गेच नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास करणार आहेत. या बदलामुळे पोलीस यंत्रणेने सुरक्षा बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि प्रवासाच्या मार्गाचे नव्याने नियोजन केले आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. यासाठी सुरुवातीला हेलिकॉप्टरने प्रवासाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रपतींचे विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथून नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर हेलिकॉप्टरने येण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून वाहनाने रामकुंड येथे व त्यानंतर हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वर आणि कार्यक्रमानंतर पुन्हा नाशिकला परतण्याचे नियोजन होते. या नियोजनानुसार विविध ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच, हेलिपॅडपासून कार्यक्रमस्थळापर्यंतच्या प्रवासाची पोलिसांकडून रंगीत तालीमही घेण्यात आली होती. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत नाशिकसह राज्याच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे. प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणात अडथळे येऊ शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन दौऱ्याच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे.
सुरक्षा यंत्रणांची धावपळ
राष्ट्रपतींचा प्रवास रस्त्याने होणार असल्याने संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा विस्तार करावा लागला. राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या सुरक्षित प्रवासासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, बॅरिकेडिंग, पर्यायी वाहतूक मार्ग आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षेची नव्याने आखणी केली जात आहे. याशिवाय ताफ्याच्या संभाव्य मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करणे आणि संपूर्ण मार्गावर रंगीत तालीम घेणेही पोलिसांकडून सुरू आहे.







Leave a Reply