त्र्यंबकेश्वर मंदिर ३०, ३१ ला बंद

I

राष्ट्रपती दौऱ्यामुळे ३० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत निर्बंध

त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शनव्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, ३० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा कार्यक्रम संपेपर्यंत, यापैकी जी वेळ नंतरची असेल तोपर्यंत मंदिरातील नियमित दर्शन बंद राहणार आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने वितरित केलेल्या अधिकृत दर्शन पासधारकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देश व राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सुरक्षाव्यवस्था अबाधित ठेवणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देणे तसेच संभाव्य गर्दीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने दर्शनव्यवस्था काही काळासाठी बंद ठेवण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *