राष्ट्रपतींच्या उपस्थितीत श्रद्धा, संस्कृती आणि माणुसकीचा अभूतपूर्व संगम
नाशिक – काही क्षण असे असतात, जे घड्याळाच्या काट्यांत मोजता येत नाहीत. ते इतिहासाच्या पानांवर नोंदवले जातात; पण त्यांचे खरे अस्तित्व असते माणसांच्या मनात. नाशिकच्या गोदातीरावर आजचा क्षण असाच होता. हजारो वर्षांची श्रद्धा जणू नदीच्या प्रवाहातून पुन्हा जागी झाली होती. मंत्रांचे स्वर आकाशाला भिडत होते. आरतीच्या ज्योतींनी गोदावरीच्या पाण्यावर प्रकाशाची नक्षी उमटवली होती. आणि त्या प्रकाशात उभी होती एक प्राचीन संस्कृती… आपल्या स्मृती, आपली माणसे, आपली सुखदुःखे आणि आपल्या उद्याच्या आशा घेऊन! विश्वविक्रमाची सोनेरी किनार लाभल्याने हा सोहळा स्मरणीय ठरला.
आज गोदावरीची आरती होत होती. पण ती केवळ नदीची आरती नव्हती. ती होती एका संस्कृतीच्या अखंड प्रवाहाला केलेली वंदना. ती होती माणसाला माणसाशी जोडणाऱ्या श्रद्धेची आरती. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ती होती पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन शोधणाऱ्या महाराष्ट्राच्या मनाची आरती! जीवनदायी गोदमाईची आराधना करतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा विक्रम साकारला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभपर्वाच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित महागोदा आरतीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती लाभली होती. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्ती गोदामाईसमोर नतमस्तक झाली होती. राष्ट्रपतींच्या हस्ते झालेले गोदापूजन, मंत्रोच्चारांनी भारलेले वातावरण आणि साधू-संतांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक विलक्षण आध्यात्मिक परिमाण लाभले होते. या महाआरतीच्या सोहळ्यात आणखी एक दृश्य विशेष अर्थपूर्ण होते. नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यांतील ६५० गावांमधून सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते. भारतीय संस्कृतीचे वैभव केवळ भव्य मंदिरांत किंवा ऐतिहासिक ग्रंथांत नाही; ते जंगलात, डोंगरदऱ्यांत, लोकपरंपरांत आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या समाजातही आहे, याची जाणीव करून देणारी ही उपस्थिती होती.
गोदामाईच्या काठावर त्या दिवशी श्रद्धेला कोणतीही सामाजिक सीमा उरली नव्हती. नदी जशी कुणाला आपले आणि कुणाला परके मानत नाही, तशीच या महाआरतीने विविधतेतील एकतेची अनुभूती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सनातन संस्कृतीच्या जतनातील जनजाती समाजाचे योगदान अधोरेखित केले. मात्र, या सोहळ्याला एक वेगळेच भावनिक वळण मिळाले, ते महाराष्ट्रातील दुष्काळाच्या उल्लेखाने. एका बाजूला गोदावरीच्या पाण्यावर आरतीचा प्रकाश तरळत होता. या प्रकाशाची आराधना करतांनाच शेतकऱ्यांच्या समस्या दूर होऊन त्यांच्या जीवनही आनंदाच्या क्षणांनी उजळून निघावे अशा व्यक्त झालेल्या भावना सोहळ्याच्या मांगल्य आणि कल्याणाच्या भावनेला साजेशा होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपत केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक मदत केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या शब्दांनी सोहळ्यातील श्रद्धेला सामाजिक संवेदनशीलतेची जोड दिली.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी तर गोदामाईच्या साक्षीने एक भावपूर्ण प्रार्थनाच केली. ‘गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होवो, बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो आणि महाराष्ट्राची भूमी पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् होवो.’ त्या प्रार्थनेचा अर्थ केवळ धार्मिक नव्हता. त्यात महाराष्ट्राच्या वर्तमानाची वेदना होती. शेतकऱ्याच्या कष्टांची जाणीव होती. पावसाची वाट पाहणाऱ्या असंख्य कुटुंबाप्रती असणाऱ्या सहवेदना होत्या. महाआरतीच्या मंगल वातावरणात एका बाजूला भारताची प्राचीन परंपरा होती, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक भारताच्या आकांक्षा होत्या. संत-महंतांचे आध्यात्मिक अधिष्ठान होते. लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च प्रतिनिधित्व होते. आदिवासी समाजाचा सहभाग होता. आणि या सगळ्यांच्या मध्यभागी होती गोदामाई…शतकानुशतके वाहणारी, अनेक पिढ्यांच्या जगण्याची साक्षीदार गोदावरीच्या पाण्यावर आरतीच्या ज्योतींची प्रतिबिंबे तरळत होती. त्या प्रकाशात एकाच वेळी भूतकाळाचे वैभव आणि भविष्याची जबाबदारी दिसत होती.







Leave a Reply