ऐतिहासिक सिंहस्थ कुंभपर्वाला नाशिक-त्र्यंबकेश्वरात सुरुवात

I

राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, ग्रामपरिक्रमा आणि महाध्वजदंड प्राणप्रतिष्ठा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज, ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज झाली असून, पूर्वसंध्येला नगरप्रदक्षिणा आणि ध्वजदंड पूजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली.

सोहळ्यास राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन तसेच शृंगेरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखर भारती स्वामी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील सुमारे १,५०० व्हीआयपींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

७१ वर्षांनंतर त्रिखंडी योग

गुरूचा सिंह राशीत प्रवेश होतो, तेव्हा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभपर्व सुरू होते. यंदा १९५६ नंतर ७१ वर्षांनी त्रिखंडी योग आल्याने कुंभमेळा २८ महिन्यांचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पर्वाच्या प्रारंभानिमित्त राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज ध्वजारोहण होणार आहे. राष्ट्रपतींचे सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर रामकुंडावर कार्यक्रम होईल. शंकराचार्य, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत गंगा मंदिराजवळील यज्ञशाळेत स्थापित देवतांचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर रामतीर्थावर गंगाभेट, मुख्य स्तंभपूजन आणि ध्वजारोहण होईल.

ग्रामपरिक्रमा उत्साहात

ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरातून भव्य ग्रामपरिक्रमा काढण्यात आली. शोभायात्रेत चार जगद्गुरू, तिन्ही आखाड्यांचे प्रमुख, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आणि ५० हजारांहून अधिक अनुयायी सहभागी झाले. महाध्वज रथ, अमृतकुंभ रथ तसेच साधू-महंतांच्या उपस्थितीने शोभायात्रेला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.

असा आहे धर्मध्वज

मुख्य धर्मध्वजाची लांबी साडेपंधरा फूट, तर उंची साडेपाच फूट आहे. ध्वजाच्या एका बाजूला बृहस्पतीचे वाहन असलेला सिंह आणि काळाचे प्रतीक म्हणून सूर्य-चंद्र दाखवले आहेत. सूर्य आणि चंद्र अस्तित्वात असेपर्यंत कुंभमेळा सुरू राहील, असा त्याचा अर्थ सांगितला जातो. सिंह शौर्याचे प्रतीक आहे, तर दुसऱ्या बाजूला अमृतकलश आहे.

हे आहेत ध्वजावरील प्रतिक

कुशावर्तावरील धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, दोन राशी, बृहस्पतीच्या भ्रमणचक्राचे प्रतीक म्हणून बारा घंटा, गोदावरीचे वाहन मगर, ओम, स्वस्तिक आणि दशदिशा दाखवण्यात आल्या आहेत. याशिवाय अमृतमंथन, गणपती, कमळ, कामधेनू, सूर्यदेवाचे वाहन अश्व, ऐरावत, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, रंभा-मेनका, लक्ष्मी, धन्वंतरी, शारंग धनुष्य आणि पांचजन्य शंख यांची चिन्हे आहेत. धर्मध्वज गोदामातेच्या अमरत्वाचे व मुक्तीचे प्रतीक मानला जातो.

आजचे कार्यक्रम

  • सकाळी ८ ते दुपारी १: स्थापित देवतांचे प्रातःपूजन
  • सकाळी ११ ते दुपारी १२: राष्ट्रपती व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेशपूजन, पंचार्घ्य समर्पण आणि तीर्थपूजन
  • दुपारी १२.०२: शुभमुहूर्तावर राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण, गोदाआरती आणि प्रार्थना
  • सायंकाळी ४.३० ते ७.३०: प्रतिष्ठापना हवन, सायंपूजन आणि गोदाआरती

असा आहे राष्ट्रपतींचा दौरा

  • सकाळी ९: नाशिकमध्ये आगमन
  • सकाळी ११: रामकुंड तीर्थ येथे आगमन
  • दुपारी १२.०२: ध्वजारोहण
  • दुपारी ३: कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथे ध्वजस्तंभपूजन
  • सायंकाळी ५: रामकुंड येथे आगमन व गोदाआरती
  • सायंकाळी ७: दिल्लीकडे प्रयाण

🎬 थेट प्रक्षेपण — सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण

थेट प्रक्षेपण: जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *