५० हून अधिक चित्ररथ, १५ बग्गींसह संत-महंतांचा सहभाग; रामकुंड येथे सायंकाळी आरतीने होणार समारोप
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरातून ध्वजाची भव्य ग्राम परिक्रमा काढली जाणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
महाध्वज प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारी (दि. ३०) तपोवनातील साधुग्राम मैदानातून दुपारी २ वाजता सुरू होणारी ही परिक्रमा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रामकुंड येथे पोहोचणार आहे. संत-महंतांचे सान्निध्य, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक चित्ररथ या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ग्राम परिक्रमेच्या आयोजनासाठी तपोवन परिसरात तयारी करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता आखाड्यांचे प्रमुख, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि संत-महंतांच्या स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता साधुग्राम मैदानातून परिक्रमेची सुरुवात होईल. तिन्ही आखाड्यांचे प्रमुख, विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आणि भाविक यात सहभागी होणार आहेत.
चित्ररथांतून धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचे दर्शन
परिक्रमेत साधू-महंतांसाठी १५ बग्गी आणि ट्रॅक्टरसह धार्मिक व सांस्कृतिक विषयांवर आधारित ५० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत. ढोल-ताशांचा निनाद, शंखनाद आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यांमुळे परिक्रमेचे वातावरण उत्साहपूर्ण होणार आहे. विविध धार्मिक संस्थांच्या सहभागातून भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या आयोजनातून केला जाणार आहे. तपोवनातून निघालेली परिक्रमा शहरातील प्रमुख मार्गांवरून पुढे जात सायंकाळी ६.३० वाजता रामकुंड येथे पोहोचण्याचे नियोजन आहे. तेथे सायंकाळची आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.







Leave a Reply