नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धर्मध्वजारोहणाने कुंभपर्वाचा शुभारंभ होणार आहे. २०२७ मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तीन प्रमुख अमृतस्नान पर्वण्या आहेत. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांना आधीच नियोजन करुन ही पर्वणी साधता येणार आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तिर्थावर धर्मध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर २ ऑगस्ट २०२७ रोजी पहिले, ३१ ऑगस्ट २०२७ रोजी दुसरे तर, तिसरे अमृतस्नान नाशिकमध्ये ११ सप्टेंबर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये १२ सप्टेंबर २०२७ रोजी होणार आहे.
तीन प्रमुख अमृतस्नानांच्या तारखा अशा
पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी, दुसरे अमृतस्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होईल. तिसऱ्या अमृतस्नानासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र तारखा आहेत. नाशिकमध्ये ११ सप्टेंबर तर, त्र्यंबकेश्वरमध्ये १२ सप्टेंबर २०२७ रोजी स्नानपर्वणी नियोजित आहे. पर्वण्यांच्या काळात रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक, निवास, स्नानस्थळांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आणि वेळोवेळी होणाऱ्या बदलांची माहिती आधीच घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जुलै २०२८ मध्ये कुंभपर्वाची सांगता
उपलब्ध वेळापत्रकानुसार, सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता जुलै २०२८ मध्ये होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे २४ जुलै २०२८ तर, नाशिक येथे २९ जुलै २०२८ रोजी ध्वजावतरण होईल.







Leave a Reply