सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; पायाभूत सुविधांच्या कामांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

(पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलक, साधुग्राम, घाट विकास आणि नागरी सुविधांवर भर; विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश)

नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन प्रभावीपणे करता यावे आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभ्या राहाव्यात, यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. पार्किंगची ठिकाणे, वाहतुकीचे मार्ग, दिशादर्शक फलक, साधुग्राममधील पायाभूत सुविधा तसेच घाट विकासाच्या कामांचा आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

पालक सचिव तथा जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी ही बैठक कुंभमेळा प्राधिकरणात झाली. बैठकीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, वन विभाग, आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कामांचे नियोजन एकमेकांशी समन्वय साधून करावे, कामांच्या सद्यःस्थितीची अद्ययावत माहिती ठेवावी आणि प्रलंबित मान्यता व तांत्रिक अडचणी वेळेत सोडवाव्यात, असे निर्देश डवले यांनी दिले. विविध यंत्रणांशी संबंधित विषयांवर निर्णय घेण्यास विलंब होणार नाही, यासाठी आवश्यक समन्वय आणि पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला.

पार्किंग आणि दिशादर्शक फलकांचे नियोजन

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित पार्किंग स्थळे, उपलब्ध जागा, वाहनांची क्षमता, प्रवेश व निर्गमन मार्ग आणि वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. भाविकांना महत्त्वाचे मार्ग, पार्किंग स्थळे आणि सुविधांची ठिकाणे सहज शोधता यावीत, यासाठी दिशादर्शक फलक कुठे लावायचे, त्यांची रचना कशी असावी आणि त्यांची अंमलबजावणी कशी करावी, यावरही चर्चा झाली.

साधुग्राममधील सुविधांच्या उभारणीवर लक्ष

साधुग्रामच्या नियोजित आराखड्यासह उपलब्ध जागा, अंतर्गत रस्ते आणि नागरी कामांचा आढावा घेण्यात आला. साधू-महंतांच्या निवासासाठी आवश्यक पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, प्रकाशव्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन एकत्रितपणे करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.

घाट विकास आणि भाविकांच्या सुविधांचा आढावा

घाटांच्या प्रस्तावित आराखड्यांसह प्रवेशमार्ग, भाविकांची ये-जा, गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता, प्रकाशव्यवस्था आणि अन्य सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. घाटांवरील कामे आणि त्यांना पूरक असलेल्या नागरी सुविधांचे नियोजन कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेऊन करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

विविध विभागांच्या कामांमध्ये सुसूत्रता राखणे, जबाबदाऱ्या स्पष्ट ठेवणे आणि कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे आवश्यक असल्याचे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नमूद केले. कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, वीज व पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सुविधा या एकमेकांशी जोडलेल्या असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत संबंधित विभागांना कामांची सद्यःस्थिती, प्रलंबित मान्यता, तांत्रिक तपशील आणि कामांच्या वेळापत्रकाची अद्ययावत माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. विविध विभागांच्या समन्वयातून मार्गी लावावयाच्या विषयांवर वेळेत निर्णय घेऊन कामांचा वेग कायम ठेवण्यावरही भर देण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, महापालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि विविध पायाभूत सुविधा उभारणाऱ्या संस्थांच्या समन्वयाने काम करत आहे.

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *