शंखनादाचा विश्वविक्रम; गोदाकाठ दुमदुमला

(अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम नाशिककरांनी मोडला)

नाशिक – अमेरिकेचा एकाचवेळी ३०३ शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मोडत ५१७ नाशिककरांनी सामूहिक शंखनादाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आणि नाशिकच्या नावावर एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणारा हा सोहळा म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा-२०२७ च्या मंगल पर्वाचा महत्वाचा टप्पा ठरला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथकाच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी (दि. २६ ऑक्टोबर) गोदाकाठी असलेल्या यशवंत महाराज पटांगणावर सामूहिक शंखनाद करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात झालेल्या शंखनादाने संपूर्ण गोदाकाठ चैतन्याने भारला गेला होता. गोदातिरावर एकाचवेळी घुमलेल्या शंखध्वनींनी नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी उत्साह निर्माण केला.

यावेळी महापौर हिमगौरी आडके, आमदार राहूल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयूष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तयारी, शिस्त आणि उत्साहाचे दर्शन

शंखनाद हा भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मंगलकार्य, धार्मिक विधी आणि आध्यात्मिक उपासनेतही शंखनादाला विशेष महत्त्व आहे. अशा परंपरेला विश्वविक्रमाची जोड देण्याचा सोहळा नाशिकमध्ये रंगला होता. शेकडो नागरिकांनी एकाचवेळी शंखनादासाठी दाखविलेली तयारी, शिस्त आणि उत्साह ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

शंख वाजवणे हीदेखील कला

शंख वाजविणे ही केवळ धार्मिक कृती नसून त्यासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव, प्राणायाम आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागींचा समन्वय साधून सामूहिक शंखनाद करणे आव्हानात्मक काम होते. नाशिकमध्ये या उपक्रमासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित एकजुटीचे दर्शन घडविले. सामूहिक प्रयत्नांतून साध्य झालेल्या या कामगिरीमुळे नाशिकच्या सांस्कृतिक ओळखीला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण; तयारीला गती

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबरला रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथेही त्याचवेळी ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी यावेळी केले.

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *